हिंगोली : वसमतच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असून याबाबतचा निर्णय राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने सोमवारी जारी केला आहे. यातून महायुती सरकारने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांची लोकसभा निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आली. लोकसभेच्या सर्वेक्षणात पाटील यांना उमेदवारी दिल्यास हिंगोलीच्या जागेवर महायुतीचा पराभव होणार असल्याचे सांगत त्यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यानंतर त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र त्या ठिकाणीही महायुतीला पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, सरकारने वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सन २०२२ मध्ये स्थापना केली आहे. त्यानंतर लगेचच केंद्राचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार पाटील यांची निवड केली आहे. सुमारे १०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये हळदीच्या वाणाचे संशोधन केले जाणार असून हळदीचे वाण विकसित करून त्याचा शेतकर्यांना लाभ मिळवून दिला जाणार आहे.
पाटील यांचे राजकिय पुनर्वसन करण्याच्या हालचाली महायुती सरकारकडून केल्या जात होत्या. त्यानंतर सोमवारी शासनाने माजी खासदार पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्ष पदावर असे पर्यंत त्यांचा मंत्री पदाचा दर्जा राहणार आहे.
याबाबतचा निर्णय राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने जारी केला आहे. माजी खासदार पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा देऊन महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदार संघातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा त्यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.