Hatta Gram Panchayat member protest
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य पुष्पक रमेशराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, तसेच हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा कराव्यात या प्रमुख मागण्यांसह इतर प्रश्नांवर २६ नोव्हेंबर रोजी हट्टा बसस्थानक परिसरात अन्नत्याग उपोषण सुरू केले होते.
सुमारे दहा दिवस चाललेले हे उपोषण शनिवारी (दि.६) मागे घेण्यात आले. वसमतचे उपविभागीय अधिकारी माने यांनी पुढाकार घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मागण्यांचा तपशीलवार अहवाल शासनाकडे पाठवून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर पुष्पक देशमुख यांनी अन्नत्याग उपोषण मागे घेण्याचा निर्णय घोषित केला.
दहा दिवस उपोषणस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले होते. अनेकांनी पत्राद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भाव, पीकनुकसान आणि वाढता शेती खर्च या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांना गती देण्यासाठी आगामी काळात विशेष बैठक घेऊन ठोस निर्णय होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. देशमुख यांनी सांगितले की, “शासनाच्या आश्वासनावर काही दिवस बारकाईने लक्ष ठेवणार आहोत, आणि गरज भासल्यास पुन्हा आंदोलन उभे करू.”
उपोषण मागे घेताना उपविभागीय अधिकारी माने, हट्टा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, हट्टा गावचे सरपंच दीपक हातागळे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मीकांत देशमुख, गोविंद देशमुख, संतोष जाधव तसेच मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.