Employees Pending Salary 
हिंगोली

Hingoli News | हट्टा ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांचे दोन वर्षांपासून वेतन थकीत; कुटुंबीयांची दिवाळी अंधारात

लाखो रुपयांची देणी बाकी, कुटुंबांवर आर्थिक संकट

पुढारी वृत्तसेवा

Hatta Gram Panchayat Employees Pending Salary

हट्टा : एकीकडे सर्वात मोठा दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे हट्टा ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र आर्थिक संकट ओढवले आहे. मागील दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्याने ऐन दिवाळीच्या सणात त्यांच्या कुटुंबांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणालाही हातात पगार नसल्याने कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे.

हट्टा ग्रामपंचायतीचे उत्पन्न भरमसाठ असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन दोन वर्षांपासून थकीत राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे विविध स्रोत असताना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक नियोजन का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियोजनाच्या अभावामुळे लाखो रुपयांची वेतनाची रक्कम थकीत असल्याची माहिती समोर येत आहे.

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्मचारी गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सेवा पार पाडतात. मात्र, गावासाठी सेवा देणाऱ्या याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर दोन वर्षांपासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिवाळीच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण, कपडे, किराणा आणि इतर सणासुदीच्या गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न असताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसेल तर आर्थिक नियोजनाचा नेमका कारभार कोण पाहत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दोन वर्षांपासून थकीत असलेले वेतन तातडीने अदा करावे, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा द्यावा आणि ग्रामपंचायतीने वेतन थकबाकीबाबत पारदर्शक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT