हिंगोली : मागील 17 वर्षापासून हिंगोली जिल्ह्याला हक्काच्या पालकमंत्र्यांची प्रतिक्षा आहे. लाल दिव्याविना जिल्ह्याचा विकास शक्य नसल्याने सातत्याने जिल्ह्याच्या पदरात किमान राज्यमंत्रीपद तरी पडेल अशी आशा लागलेली असते. आता मागील दोन दिवसांपासून महायुतीतील तीनही आमदारांच्या समर्थकांनी काही ठिकाणी बॅनरबाजी करून आमच्या नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचा दावा सुरू केला आहे. समाज माध्यमावरही सध्या लाल दिव्याची चर्चा सुरू असल्याने दिवाळीच्या तोंडावर जोरदार राजकीय फटाकेबाजी सुरू झाली आहे.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यानंतर जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. परिणामी विकासाचा अनुशेष वाढत गेला. जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नाहीत, सिंचनाच्या नावाने बोंबाबोंब आहे. जवळपास 15 हजार हेक्टरपेक्षा जास्त सिंचन अनुशेष अद्यापही भरून निघालेला नाही. सिंचनाचे प्रकल्प तर सोडा उलट जिल्ह्याचे हक्काचे पाणी नांदेडकडे पळविले जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र चिडीचुप्प आहेत.
सामान्य जनतेत प्रचंड रोष असताना मागील आठवड्यापासून महायुतीतील तिनही आमदारांच्या समर्थकांनी आमच्या नेत्याची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचा दावा सुरू केला आहे. काहींनी तर चक्क बॅनरबाजी सुरू केली आहे.
महायुतीतील तिनही आमदारांच्या समर्थकांकडून मंत्रीपदावर दावा सांगितला जात असल्याने मोठा संशयकल्लोळ उडाला आहे. मंत्रीपद मिळेल किंवा नाही हे सांगणे शक्य नसले तरी त्यानिमित्ताने सामान्य जनतेची मात्र चांगलीच करमणुक होत असल्याचे चित्र आहे.
विद्यमान पालकमंत्री झिरवाळ हे नाशिकातून हिंगोलीचा कारभार पाहत आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संकट गंभीर होणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून चारा पाण्याचे नियोजन केल्याचा दावा केला जात आहे.
परंतू, वस्तुस्थिती पाहुन नियोजन केले जात आहे की नाही याबाबत मात्र स्पष्टपणे काहीच दिसून येत नाही. परिणामी, राजकीय उदासिनतेचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
कळमनुरीचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांची भविष्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तार किंवा खांदेपालटात वर्णी लागणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. आ. बांगर यांना मंत्रीपद मिळाल्यास मराठवाड्यात शिवसेनेचे बळ वाढणार असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने पक्षश्रेष्ठींकडून त्यांना न्याय दिला जाईल, मंत्रीपद देऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासह पक्षवाढीसाठीही आ. मुटकुळे हातभार लावतील असा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत. वसमतचे आमदार राजुभैय्या नवघरे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मंत्रीपदाची संधी देऊन पक्षाला मराठवाड्यात विस्तारीत करण्याचा प्रयत्न करतील असे आ. नवघरे यांचे समर्थक सांगत आहेत. एकुणच तीनही आमदारांच्या समर्थकांकडून आमच्या नेत्याची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचा दावा केला जात आहे. दिवाळीनंतर यावर निर्णय होईल असे देखील सांगितले जात आहे.