Aundha Nagnath Gram Panchayat Officials Protest Pudhari
हिंगोली

Aundha Nagnath Protest | ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे औंढा नागनाथमध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन; जिल्हा मेळाव्यासाठी सामूहिक रजेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Gram Panchayat Officials Protest

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ११) पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते.

दि. १५ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा मेळाव्यासाठी एकदिवसीय सामूहिक रजा मंजूर करावी, यासह एकूण विविध मागण्या संघटनेने प्रशासनासमोर मांडल्या.

चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले निलंबन तसेच वेतनवाढ बंद करण्याची कारवाई रद्द करावी, शासन निर्णयानुसार निनावी तक्रारी तसेच ठोस पुरावे नसलेल्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करू नये, अतिरिक्त ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन निर्णयानुसार अतिरिक्त मानधन देण्यात यावे, विभागीय चौकशीत दोषी ठरलेल्या प्रकरणांत सौम्य शिक्षा देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शासन निर्णयानुसार केवळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नये, पाच वर्षांचे गोपनीय अहवाल ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, तसेच सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांची निवड करून तातडीने पुरस्कार वितरण करावे, अशीही मागणी करण्यात आली.

याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी संवर्गातून विस्तार अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर पदोन्नती करावी, १०-२०-३० वर्षांची कालबद्ध पदोन्नती तातडीने द्यावी, विविध विकास योजनांची कराची रक्कम पंचायत समिती स्तरावरून कपात केली जात असताना ती ग्रामपंचायतींना विलंबाने मिळत असल्याने त्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नये, अशी मागणीही करण्यात आली.

जलजीवन मिशनच्या कामांची चेकलिस्ट व योजनेशी संबंधित सर्व अभिलेखे ग्रामपंचायतींना तयार करून द्यावेत, ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या सेवा पुस्तिका अद्ययावत करून त्यांची द्वितीय प्रत प्रमाणित करून द्यावी, तसेच प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके मंजूर करून त्याचा लाभ तातडीने देण्यात यावा, या मागण्याही आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. या आंदोलनात औंढा नागनाथ तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT