

औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथे पवित्र श्रावण महिन्यात शिवभक्तांच्या कावड यात्रांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अकोला, वाशिम, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांतून भाविक कावड घेऊन नागेश्वर नागनाथाला जलाभिषेक करण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
श्रावणातील सोमवार आणि सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांची रीघ लागत असून, सकाळी पाच ते दुपारी एक या वेळेत दर्शन रांगेत भाविकांना पाच ते सहा तास लागत आहेत. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी सुलभ दर्शनाची चांगली व्यवस्था केली असल्याने संस्थानाचे कौतुक होत आहे.
मात्र, कावड यात्रांसोबत असणाऱ्या डीजेच्या कर्कश आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. भक्तिभावाने निघणाऱ्या या यात्रांमध्ये कर्णकर्कश डीजे वाजवणे आणि शहर-गावांजवळ येताच वाहनांवर उभे राहून नाचणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. नुकतीच दिग्रस कराळे येथे दोन डीजे वाहनांच्या गोंधळात श्रीक्षेत्र नाथनंगे महाराज (डव्हा) येथील एका तरुण कावडधाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. याशिवाय, कावड यात्रांमध्ये लहान मुलांची वाढती संख्या पाहता वयाचे बंधन घालणे गरजेचे बनले आहे.
दुसरीकडे, औंढा नागनाथ येथील मुख्य रस्त्यावर कावडधारी, पायी दिंड्या, भजनी मंडळे, पादचारी आणि वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून केवळ दोन होमगार्ड नियुक्त करण्यात आल्याने वाहतूक यंत्रणा वारंवार कोलमडत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची मागणी होत आहे.