Hingoli Firing Death  
हिंगोली

Hingoli Firing Death | कळमनुरीत जुन्या वादातून गोळीबार; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

काही जण ताब्यात; शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त, परिस्थिती नियंत्रणात

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी : शहरातील जुना बसस्थानक परिसरात बुधवारी 15 जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास दोन गटांतील जुन्या वादाने हिंसक रूप घेतला व वादात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला, तर चौघे जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले आहे. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील इंदिरानगर परिसरातील काही तरुण आणि पठाण मोहल्ल्यातील तरुणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. यापूर्वी शाब्दिक बाचाबाचीनंतर हा वाद शांत झाला होता. मात्र, 15 जुलै रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. किरकोळ हाणामारीनंतर एका गटातील काही जणांनी गावठी कट्ट्यांतून गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

या गोळीबारात लुकमान सिद्दीकी (वय 38) यांचा मृत्यू झाला. तर ओसामा सिद्दिकी, सारिया सिद्दिकी, इम्रान पठाण आणि मेहराज सिद्दिकी हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना प्रथम कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे, रघुनाथ शेवाळे,आणि उपनिरीक्षक दिलीप मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच शहरात कायदा सुव्यवस्था साठी बंदोबस्त लावला.

आरोपींचा शोध साठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आपसातील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT