हिंगोली

Ardra Nakshatra rain : मृग कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आर्द्रा नक्षत्राकडे; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम

बहुतांश शेतकरी पूर्णपणे कोरडवाहू शेतीवर आणि निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहेत

पुढारी वृत्तसेवा

जवळाबाजार : खरीप हंगामातील पेरणीसाठी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, या आशेने शेतकरी बांधवांनी जय्यत तयारी करून ठेवली होती. मात्र, मृग नक्षत्रात दिवसभर तापमान वाढत राहिले आणि पावसाने दडी मारली. आता २२ जूनपासून पावसाचे दुसरे म्हणजेच 'आर्द्रा' नक्षत्र सुरू झाले असून, शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सध्या वर्तवले जाणारे वेगवेगळे हवामान अंदाज यांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने, गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही खरीप पेरण्यांना विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सर्व आर्थिक नियोजन खरिपावर अवलंबून

शेतकरी बांधवांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन खरीप हंगामातील पिकांवरच अवलंबून असते. शेतीचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि इतर सुख-दुःखाचे प्रसंग या सर्वांचे गणित या उत्पन्नातूनच सुटते. या भागात रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने, बहुतांश शेतकरी पूर्णपणे कोरडवाहू शेतीवर आणि निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहेत. चालू हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून महागडी बियाणे आणि खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पावसाला विलंब झाल्यास खरिपाचे उत्पादन घटते, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

ढगाळ वातावरणामुळे आशा पल्लवित

मृग नक्षत्र संपून आता आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले असून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. आर्द्रा नक्षत्राच्या काळात जर ३ ते ४ मुसळधार पाऊस झाले, तरच शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करता येईल. सध्याच्या परिस्थितीत मुसळधार पाऊस झाल्यास पेरण्यांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणातून लवकरच जोरदार पाऊस बरसून निसर्ग साथ देईल, अशी चातकासारखी प्रतीक्षा परिसरातील शेतकरी बांधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT