गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा: सोयाबीन, कापूस पिकांसाठी पिकविमा द्यावा, दुष्काळ जाहीर करावा, बँकेची कर्जफेड परत करावी, अन्यथा आमचे मानवी अवयव विकत घ्यावे, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील १० शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज (दि. २२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले.
सततची नापिकी शेतमालाला अल्प भाव, कधी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, या आस्मानी सुलतानी संकटात शेतकरी गेल्या पाच सहा वर्षांपासून भरडला जात आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यंदाच्या वर्षी खरीपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला. येलो मोझॅकमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यात सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचे कर्जफेड कशाच्या आधारे करावी, अशी चिंता लागून राहिली आहे. लाल्या रोग्याने बोंड अळी कापसाच्या पऱ्हाट्या झाल्या आहेत. कापसाला बाजारपेठेत भाव नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
या निवेदनावर गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा