हिंगोली : जिल्ह्यातील सोयाबीन विमा व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कनेरगाव-जिंतूर रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. pudhari photo
हिंगोली

Hingoli farmer protest : प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक

विमा, बोगस औषधी कंपन्या अन्‌‍ गौण खनिज उत्खननाविरुद्ध संताप

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा विमा अद्यापही न मिळाल्याने आणि जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांमुळे शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी सकाळी कनेरगाव-जिंतूर महामार्गावरील हाताळा फाटा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मागील वर्षी अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने पॅकेज जाहीर केले असले, तरी विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याशिवाय, जिल्ह्यामध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून अनेक कंपन्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या उत्खननाचा रितसर भरणाही करण्यात आलेला नाही, तरीही प्रशासन गप्प का? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.

बोगस औषधी कंपन्यांवरून कृषी विभागावर तोफ

जिल्ह्यात 70 पेक्षा जास्त बोगस जैविक पेस्टिसाइड (कीटकनाशक) कंपन्या कार्यरत असून, शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. मात्र, जिल्हा कृषी अधीक्षक यावर चकार शब्दही बोलायला तयार नसल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला. तसेच, सेनगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून रोजगार हमीची कामे बंद असल्याने मजूर आणि शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहीर, गायगोठे यांसारख्या कामांना मंजुरी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

पोलिस बंदोबस्तात आंदोलन

आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सतीश इडोळे, प्रवीण मते, राहुल कावरखे, बबन कावरखे, अशोक कावरखे, दीपक सावके, शांतिराम सावके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT