हिंगोली : जिल्ह्यात आज ११ जुलै रोजी सकाळी ११:२६ वाजता भूगर्भातून मोठा आवाज येत सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता ३.५ इतकी नोंदवण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील 'वसई' परिसरात असून, तो जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर होता. या धक्क्यामुळे परिसरात घबराट पसरली असली, तरी सुदैवाने जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासन या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असून, संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन
भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे; असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.