हिंगोली : दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन संवेदनशीलतेने काम करीत असून, शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.
या तालुक्यांतील पीक परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाने संकलित करावी, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शासन त्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कळमनुरी तालुक्यातील अराठी येथे दुष्काळसदृश्य पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. पिकांचे नुकसान, पावसातील खंड आणि सद्यःस्थितीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासनाकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, आमदार संतोष बांगर, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल वायसे,उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जे. के. कांबळे, तालुका कृषी अधिकारी के. एस. जाधव, पदाधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यांतील पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या परिस्थितीत चारा, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत याबाबत तत्परतेने काम करण्यात येईल असे बावनकुळे यांनी सांगितले.
शेतकरी व नागरिकांची स्वीकारली निवेदने
दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार, शेतकरी तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांशी संबंधित निवेदने स्वीकारली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, आमदार डॉ. प्रज्ञा सातव व पदाधिकारी आदीची उपस्थिती होती. यावेळी विविध प्रश्न व मागण्यांबाबत नागरिकांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेदने सादर केली. शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना तसेच स्थानिक पातळीवरील विविध विकासकामांबाबतही नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक तो दिलासा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.