Farmers Crisis Hingoli
गोरेगाव : अंगणात दिवाळीचे दिवे लागण्याची वेळ आली, पण शेतकऱ्याच्या घरात मात्र दुष्काळ आणि काळोख दाटून आला आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातची गेली. आता जमिनीत ओलच नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिली, नंतर जेव्हा पीक जोमात होते तेव्हा पावसाने अचानक पाठ फिरवली. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोसल्याच नाहीत, तर तुरीची वाढच खुंटली. शेतकऱ्याने कर्ज काढून केलेला खर्चही निघाला नाही. एकरी 8 ते 10 हजारांचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसला आहे.
खरीप गेल्यावर रब्बीवर आशा होती. शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, रब्बी पेरणी करण्याची तयारी केली, पण जमिनीत पुरेशी ओलच नाही. विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्याने पाणीच शिल्लक नाही. भूगर्भातील पाणी पातळी 50 फुटाच्या खाली गेल्याने रब्बीच्या पेरण्या 80% पर्यंत खोळंबल्या आहेत.
बाजारात महागाई वाढली, पण शेतमालाला भाव नाही आणि हातात पीकच नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी मुलाबाळांना कपडे, फराळ, फटाके कसे घ्यायचे? असा प्रश्न गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांसमोर आहे. अनेकांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत आहेत.
कृषी विभागाने तात्काळ या भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा यंदाची दिवाळी गोरेगावकरांसाठी केवळ दिव्यांविनाच राहील, अशी स्थिती आहे.