Hingoli City corporator cleaning
औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सहा महिन्यापासून नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने नाल्यांची, रस्त्याची साफसफाई करण्यात आली नाही असा आरोप केला. तसेच नगरसेविका कुंताबाई गोबडे यांनी नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी स्वतः तुंबलेल्या नाल्यांची तसेच रस्त्यावरील साफसफाई केली आहे.
केंद्र व राज्य शासनाने गाव स्वच्छतेवर भर दिला असून स्वच्छतेच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी औंढा नागनाथ नगरपंचायत परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिराचे पावित्र्य राखणे सुद्धा नगरपंचायतला होत नसून देश विदेशातून पर्यटक, भाविक भक्त आणि प्रवासी येथे दर्शनाच्या निमित्ताने येतात. ठिकठिकाणी नाल्या व कचऱ्यांची ढिगारे झाल्याने नाली मध्ये कचरा अडकल्याने नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यातच गणेशोत्सवाचा सण जवळ येत असल्याने प्रभाग १५ मध्ये अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नगरसेविका कुंताबाई कुबडे यांनी प्रभागातील गोबाडे गल्लीतील कचरा स्वतः उचलुन प्रभागाची साफसफाई केली. गेल्या सहा महिन्यापासून त्या स्वखर्चाने प्रभागांमध्ये तुंबलेल्या नाल्यांची सफाई व कचऱ्याचे ढीग उचलून साफसफाई करत आहेत.