Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
हिंगोली : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथून निघणाऱ्या पालखी सोहळ्यातील रथ ओढणाऱ्या बैलजोडीला यंदा हिंगोलीचा साज लाभणार आहे. बैलजोडीसाठी तयार करण्यात आलेला पारंपरिक साज नुकताच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे सुपूर्द करण्यात आला.
आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. हरिनामाच्या गजरात लाखो वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पायी वाटचाल करतात. या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा तसेच चहा-नाश्त्याची व्यवस्था विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींकडून केली जाते. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या सेवाकार्यात अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
याच भावनेतून हिंगोलीतील भांड्यांचे व्यापारी राहुल कानडे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाला जुंपल्या जाणाऱ्या बैलजोडीसाठी आकर्षक साज अर्पण करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी पितळी मोरक्या, पितळी कासरा आणि अन्य आवश्यक साहित्य तयार करून घेतले.
या साजातील विशेष आकर्षण असलेला सुमारे ८ ते १० फूट लांबीचा पितळी कासरा रिसोड येथील कारागीर देवराव रंजवे यांनी पूर्णपणे हस्तकलेतून तयार केला. हा कासरा तयार करण्यासाठी त्यांना सुमारे १० ते १५ दिवसांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे, ही सेवा समजून त्यांनी कोणताही मोबदला स्वीकारला नाही. कासऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य राहुल कानडे यांनी उपलब्ध करून दिले.
बैलजोडीच्या साजाचे संपूर्ण साहित्य नुकतेच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाबद्दल संस्थानच्या वतीने राहुल कानडे यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.