गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास भाजप नेते मल्लिकार्जुन बुरपुटे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी चार ते पाच हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठ दिवसांत गिरगाव परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. चोरट्यांकडून रस्त्यालगतची दुकाने लक्ष्य केली जात असल्याने लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, शेतशिवारातील मोटारपंप, केबल, पाइप आणि शेतीसाठी लागणारे साहित्य चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा धुमाकूळ
गावात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त पुरेशी नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेषतः मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांची नियमित गस्त नसल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच गावातील तसेच मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. या परिस्थितीचा फायदा चोरटे घेत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गावात बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाही बंद असल्याने चोरीच्या घटनांतील आरोपींचा माग काढताना अडचणी निर्माण होत आहेत. एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली असून दिवसा देखील असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.https://www.youtube.com/watch?v=bN-K3XYM_Is
पोलिस यंत्रणेने विशेषतः रात्री १ ते ३ या वेळेत स्वतंत्र पथक नेमून गस्त वाढवावी. गावातील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत आणि बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत— ग्रामस्थ व शेतकरी, गिरगाव