Hingoli Basmat Youth Stoned To Death
वसमत : वसमत शहरातील सोमवारपेठ परिसरात पोलिसांना माहिती (टिप) दिल्याच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाची दगड व विटांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१०) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश डिगांबर गुंडाळे (वय २२, रा. रुपला पांढरी, ता. पूर्णा, जि. परभणी, सध्या रा. पाटीलनगर, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास सोमवारपेठ येथील बिट क्रमांक ४ परिसरात ही घटना घडली.
या प्रकरणी पवन माणिकराव डाखोरे (वय २७, रा. पळसगाव, ता. वसमत) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून रुषीकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी व अनिकेत देवकर (सर्व रा. वसमत) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ०५७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, "तू पोलिसांना टिप का देतो?" या कारणावरून आरोपींनी संगनमत करून गणेश गुंडाळे यास दगड व विटांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सकाळी ७.४९ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार व पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेमुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे.