Aundha Panchayat Samiti Employee Suspension
औंढा नागनाथ : पंचायत समितीमधील 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पंचायत समितीच्या लेखा विभागातील तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी (दि. 27) काढले आहेत. या आदेशाने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये लेखा विभागात कपातीच्या रकमेमध्ये 57 लाख रुपयांचा गैरव्यव्हार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये जीएसटी, विमा, आदी रक्कम कपात करून या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे सादर करण्यात आला होता. सहा महिन्याचा कालावधी उलटला तरीही दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली नव्हती.
गैरव्यवहार केल्याची रक्कम संबंधित कर्मचारी परत करणार होते. या प्रकरणाची उलट सुलट चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू होती. दरम्यान, जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हे रुजू होताच त्यांनी या गैरव्यवहाराबद्दल मुख्यलेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला.
या प्रकरणात पंचायत समितीच्या लेखा विभागातील कर्मचारी के. एन. इंगोले, जी .एन .वाघमारे, ए. व्ही. मुळे यांना निलंबित करण्यात आले आहे .या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले. तर नितीन शर्मा हा कर्मचारी यापूर्वीच निलंबित करण्यात आला आहे. सेनगाव पंचायत समिती अंतर्गतही असाच व्यवहार झाला होता. तेथील कर्मचाऱ्यांना परिषदेच्या लेखा विभागाने निलंबनाची कारवाई व त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
औंढा नागनाथ येथील दोषी कर्मचाऱ्यांवर अद्याप पर्यंत ही कारवाई होत नव्हती. त्यामुळे तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाच्या पथकाने सादर केलेल्या अहवाला मुळे दोषी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे धडा शिकवला गेला आहे.