पोलिस भरती : गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी file photo
हिंगोली

Aundha Nagnath News | 'तुझी संधी हुकणार नाही'; पोलिस भरतीसाठी निघालेल्या अपघातग्रस्त तरुणीला कोल्हापूर पोलिसांचा दिलासा

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील तरुणीचा कोल्हापूरला येताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Aundha Nagnath girl accident

हिंगोली : कोल्हापूर पोलिस दलातील शिपाई पदासाठी निवड झालेल्या एका तरुणीचा कागदपत्र पडताळणीसाठी जात असताना अपघात झाला. त्यामुळे नोकरीची संधी हुकण्याची भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, कोल्हापूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधून “तुझी संधी हुकणार नाही” असा दिलासा दिल्याने संबंधित तरुणी भावूक झाली.

कोल्हापूर पोलिस दलात नुकतीच शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे हिनेही या भरतीत यश मिळवले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत पुढे आलेल्या सागरच्या यशामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पोलिस दलातील नोकरीमुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा कुटुंबीयांना होती.

दरम्यान, आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सागर रिठ्ठे शुक्रवारी रात्री खासगी ट्रॅव्हल्सने कोल्हापूरकडे रवाना झाली होती. मात्र, सांगोला गावाजवळ ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात सागरच्या छातीला आणि पायाला दुखापत झाली. तिला तत्काळ सांगोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातानंतर वेळेत कोल्हापूरला पोहोचता येणार नाही आणि त्यामुळे नोकरीची संधी हातची जाईल, या चिंतेने सागर आणि तिचे कुटुंबीय व्यथित झाले होते. ही बाब पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तत्काळ कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.

यानंतर सागरने पोलिस अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, “घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. तू तब्येतीची काळजी घे. कागदपत्रे जमा करण्यासाठी सोमवारी आली तरी चालेल. कोणतेही टेन्शन घेऊ नकोस,” असे सांगत त्यांनी तिला धीर दिला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या या दिलासादायक प्रतिसादामुळे सागरला अश्रू अनावर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT