Aundha Nagnath Parbhani Road tempo bike collision
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ–परभणी मार्गावर खंडेश्वरी मंदिर ते नागनाथ महाविद्यालय परिसरात बुधवारी (दि. १) रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
या अपघातात शिवम हरिभाऊ चौरे (वय २५, रा. पिंपळा, ता. वसमत) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप दत्तराव सवंडकर (वय २०, रा. टेंभुर्णी, ता. वसमत) आणि अमजदखा शरीफखा पठाण (वय १९, रा. कातनेश्वर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, दूध डेअरीचा टेम्पो (क्र. MH-38 X 4491) औंढा नागनाथकडे येत होता. त्याचवेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून युवक औंढा नागनाथहून वसमतकडे जात असताना खंडेश्वरी देवी मंदिराजवळ हा अपघात झाला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस आणि पोलीस अंमलदार ओंकारेश्वर रांजणेकर हे परभणी कारागृहातून परत येत असताना त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांना कळवून १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले.
एपीआय खयामुद्दीन खतीब व राजाराम कदम यांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे औंढा नागनाथ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.