Aundha Nagnath Panchayat Samiti Fraud
औंढा नागनाथ: औंढा नागनाथ पंचायत समिती मधील 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने उलट उलट चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे समितीनेच कायदेशीर कारवाईची शिफारस केली असून आता कायदेशीर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या सन 1 एप्रिल 2023 ते डिसेंबर2024 या कालावधीत झालेल्या लेखा विभागातील गैरव्यवहाराची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली होती. या तपासणीसाठी मुख्यालेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी पथक नियुक्त केले होते. पथकाने प्रत्यक्ष पंचायत समितीमध्ये जाऊन तपासणी केली. तपासणीमध्ये तब्बल 57 लाख रुपयांचा गैर व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये प्रामुख्याने पंधरावा वित्त आयोगाच्या कपातीच्या रकमेत 11.96 लाख रुपये, तर जिल्हा परिषद वित्तीय प्रणालीच्या नोंदीनुसार कपातीच्या रकमामध्ये 45.57 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे.
या संदर्भातील अहवाल समितीने सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला सादर केला आहे. गैरव्यवहारासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. लेखा परीक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर अद्यापही दोषीवर कुठलीच कायदेशीर कारवाई झाली नसल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे सेनगाव पंचायत समितीच्या गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा परिषदेने दोषी कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दोषी चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले. मात्र, औंढा नागनाथ पंचायत समिती मधील गैरव्यवहार प्रकरणात दोषींना अभय दिले जात असल्याने काय गौडबंगाल आहे? या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.