Aundha Nagnath Municipal Employees Strike
औंढा नागनाथ: औंढा नागनाथ नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी दि. 23 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी विविध मागण्यांसाठी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, नगरपंचायतीच्या रोजनदारीवर काही कर्मचारी तैनात केले असले तरी, त्यांना काम न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पंधरा महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरित देणे, शासनाच्या नियमांनुसार किमान वेतन वाढवणे, सफाई व पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या वारसांना कामावर घेणे, तसेच सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा लागू करणे, आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.
या आंदोलनात मधुकर मुळे, गणपत रणखांबे, गौतम मुळे, भिकू राठोड, रमेश थोरात, मुंजा रनखांबे, पंडित रणखांबे, मारुती पांढरे, गयाबाई रणखांबे, छायाबाई रणखांबे, रुक्मीनाबाई रणखांबे, लताबाई रणखांबे, धुरपत बाई सोनवणे, कांताबाई रणखांबे, राजाबाई रणखांबे, नंदाबाई रणखांबे यांचा समावेश आहे.
दोन महिन्यांपूर्वी नगरपंचायतीने कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वेळा निवेदन देऊनही नगरपंचायतीने या मागणीवर लक्ष दिले नाही. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्यांची मागणी स्वीकारली जात नाही, तोपर्यंत ते उपोषण थांबवणार नाहीत.
या प्रकरणी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.