Aundha Nagnath Short Circuit Fire
औंढा नागनाथ : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी (दि. ३०) सकाळी लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. सकाळी सातच्या सुमारास एका दुकानातून धूर निघू लागल्यानंतर आगीची घटना उघडकीस आली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. औंढा नागनाथ आणि हिंगोली येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी नऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, सहा दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
जुन्या बसस्थानक परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्ती, बॅटरी दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिकल साहित्य विक्रीची दुकाने आहेत. शुक्रवारी सकाळी सुमारे सात वाजता एका दुकानातून अचानक धूर निघू लागला. परिसरातील हॉटेल चालकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना सावध केले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्यासह जमादार ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण, अनिल नागुलवार, दिनकर पोले, वसंत चव्हाण आणि रवीकांत हरकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवली. तसेच औंढा नागनाथ आणि हिंगोली येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर सकाळी नऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या आगीत सरफराज पठाण, अखिल पठाण, नामदेव कोकाटे, सतीश बेद्रे, अब्दुल कादिर आणि रामभाऊ सारुखे यांच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. दुकानांमधील मोबाईल, बॅटरी, इलेक्ट्रिकल साहित्य आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिस आणि नागरिकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने तसेच अग्निशमन दलाने तत्परतेने काम केल्याने आग आटोक्यात आणता आली. त्यामुळे परिसरातील अन्य दुकाने आणि मालमत्तेचे संभाव्य नुकसान टळले. दरम्यान, महसूल विभागाच्या पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत आकडा पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.