Aundha Nagnath Girl Death
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती शांतिराम घनसावंत (वय 17, रा. अंजनवाडी) ही आपल्या कुटुंबासमवेत राहत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत तिने 67 टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते.
रविवारी सकाळी कुटुंबातील सदस्य विविध कामानिमित्त घराबाहेर गेले असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. काही वेळानंतर घरासमोरून जाणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. तिने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर संबंधित तरुणीला उपचारासाठी जवळा बाजार येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार आर. वाय. ठाकूर तसेच एस. एल. चंद्रशेखर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी शांतिराम श्रीरंग घनसावंत यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.