Hingoli News | दिग्रस बु परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी पिकांचे मोठे नुकसान

अडीच ते तीन हजार प्रतिक्विंटल भाव सुरू
Hingoli News | दिग्रस बु परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी पिकांचे मोठे नुकसान
Published on
Updated on

आखाडा बाळापूर,: कळमनुरी तालुक्यातील दिग्रस,बु. जवळा पांचाळ, परिसरात शुक्रवार (दि. 13 जून) रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या सुसाट वाऱ्यामुळे परिसरातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक बागा अक्षरशः आडव्या झाल्या आहेत.

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने शेतातील आखाड्यांवरील तसेच गावातील काही घरांवरील पत्रे उडून गेली. अनेक शेतकऱ्यांच्या आखाड्यांचे नुकसान झाले असून शेतात उभारण्यात आलेल्या सोलार संचांनाही फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी नुकतीच बेडवर हळदीची लागवड केली होती. मात्र, झालेल्या मुसळधार पावसामुळे ही लागवड वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दिग्रस परिसरातील लहान-मोठे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाण्याचा जोर वाढल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे सध्या बाजारात केळीला अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल असा समाधानकारक भाव मिळत आहे. वर्षभर कष्ट करून, हजारो रुपये खर्च करून जोपासलेला केळीचा मळा कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच निसर्गाच्या या अवकाळी आघाताने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news