Dhananjay Upalwad Appointment
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ नगरपंचायतीला गेल्या चार वर्षांपासून लागलेले प्रभारी मुख्याधिकारी पदाचे ‘ग्रहण’ अखेर सुटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी धनंजय उपलवाड यांची नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती केली. कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले, तरी विस्कळीत झालेला प्रशासनाचा कारभार आणि शहरातील प्रलंबित मूलभूत समस्या मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उपलवाड यांच्यासमोर असणार आहे.
गेल्या चार वर्षांत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीच्या कारभारात सातत्याचा अभाव राहिला. प्रभारी अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्यांमुळे दीर्घकालीन नियोजन आणि ठोस निर्णयप्रक्रियेला अपेक्षित गती मिळाली नाही. परिणामी प्रशासनाच्या अंतर्गत आणि बाह्य कामकाजावर परिणाम झाल्याची नागरिकांची भावना आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकासकामांवर खर्च झाला असला, तरी अनेक मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत.
गेल्या अकरा वर्षांत नगरपंचायतीला तब्बल १३ मुख्याधिकारी मिळाले. त्यापैकी ११ प्रभारी, तर केवळ दोन नियमित होते. नियमित अधिकाऱ्यांचाही कार्यकाळ सुमारे साडेतीन वर्षांचा राहिला. प्रभारी व्यवस्थेमुळे प्रशासनात दीर्घकालीन विकासाची दिशा निश्चित करण्यात अडथळे निर्माण झाले.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, नाल्यांची साफसफाई न होणे, बंद पथदिवे आणि सफाई कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची मागणी सातत्याने होत होती.
दरम्यान, गेल्या अकरा वर्षांत नगरपंचायतीला १० नगराध्यक्ष आणि आठ उपनगराध्यक्ष लाभले. नेतृत्वातील या अस्थिरतेचाही प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचे बोलले जाते.
आता धनंजय उपलवाड यांच्यासमोर नगरपंचायतीचा विस्कळीत कारभार सुरळीत करणे, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणणे, मूलभूत सुविधा सुधारणे आणि रखडलेल्या विकासकामांना गती देणे, अशी अनेक आव्हाने आहेत. कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने औंढा नागनाथच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, प्रशासनाला ते कितपत कार्यक्षम आणि शिस्तबद्ध करतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.