औंढा तहसील कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. Pudhari
हिंगोली

Government Employees Strike | शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा औंढा तालुक्यात परिणाम; कामकाज ठप्प, नागरिकांची गैरसोय

Hingoli News | केवळ पाच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तहसीलचा कारभार सुरू, दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प

पुढारी वृत्तसेवा

Government Employees Strike

औंढा नागनाथ : राज्यभर सुरू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा परिणाम औंढा तालुक्यात दिसून येत आहे. तहसील कार्यालयातील एकूण ५३ कर्मचारी संपात सहभागी झाले असून, तीन कर्मचारी रजेवर आहेत. परिणामी केवळ पाच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तहसीलचा कारभार सुरू असून, दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

राज्यातील सुमारे १७ लाखांहून अधिक कर्मचारी व शिक्षकांनी २१ एप्रिलपासून संप पुकारला आहे. त्याचा फटका महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय तसेच शिक्षण विभागालाही बसला आहे. औंढा तालुक्यातही मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संपामुळे तहसील कार्यालयातील उत्पन्न दाखले, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखले यांसारखी कामे ठप्प झाली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा फेरफार नोंदीही रखडल्या आहेत. मुद्रांक विक्री आणि दस्त नोंदणीची कामेही बंद पडली आहेत.

आरोग्य विभागातही संपाचा परिणाम जाणवत असून, जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधील लिपिक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. वारंवार निवेदने व आंदोलने करूनही शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

या संपामुळे एकीकडे शासनाचा महसूल बुडत असून, दुसरीकडे सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT