Aundha Nagnath two bikes collision four injured
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ शहरातील विश्रामगृह जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री घडली.
दुचाकीवरून (एमएच २० डीवाय ०५१३) औंढा नागनाथ कडे येणारे भोजाजी दाडगे (वय ६०), विमल भोजाजी दाडगे (वय ५०), सुनील भोजाजी दाडगे (वय २२, सर्व रा.वडधुती, ता. जिंतूर, जि. परभणी) तर औंढा नागनाथकडून विना क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवर वसमत कडे जाणारे मनोज वाघमारे (वय २१, रा. औंढा नागनाथ) असे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, जमादार वसीम पठाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गंभीर जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून हिंगोली येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या प्रकरणी आज (दि.९) सकाळी अकरा वाजेपर्यंत गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांनी दिली.