हिंगोली

हिंगोली: कुरुंद्यात जमादारास मारहाण करून पीएसआयचे पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न

अविनाश सुतार

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे भांडण सोडविण्याच्या कारणावरून जमादारास मारहाण करून उपनिरीक्षकाचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एका तरुणाविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यश गंगाधर इंगोले याला ताब्यात घेतले आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे दुर्गामाता मंदिरासमोर यश इंगोले सार्वजनिक मिरवणुकीत अश्लिल शिवीगाळ करून आरडा ओरड करून मारामारी करीत होता. या प्रकार लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक गवळी, जमादार बालाजी जोदगंड यांनी त्यास समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी यश याने तुम्ही आमचे भांडण का सोडवले, अशी विचारणा करून जमादार जोगदंड यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी उपनिरीक्षक गवळी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने उपनिरीक्षक गवळी यांची पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत गवळी यांच्या पिस्टलच्या दोरीचे हुक तुटले. त्यानंतर यश याने माझ्यावर गुन्हा दाखल केला, तर खत्म करून टाकतो, अशी धमकीही दिली. मात्र मिरवणूक शांततेत पार पाडावी, यासाठी पोलिसांनी संयमाची भूमिका घेत वाद संपविला.

या प्रकरणी जमादार जोगदंड यांनी रात्री उशीरा कुरुंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी यश इंगोले याच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. जमादार जोगदंड पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT