हिंगोली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेतानाच लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे आढावा बैठक व लाभार्थी समस्या निवारण मेळावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचे कौतुक केले. ही योजना आदर्श ठरल्यामुळे अन्य २६ महामंडळांमध्येही अशा स्वरूपाच्या योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. महामंडळाच्या कार्यपद्धती व मार्गदर्शनामुळे मागील आर्थिक वर्षात सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या युवकांनी वाहन व्यवसायापुरते मर्यादित न राहता सेवा, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही उद्योग सुरू करावेत. स्वतःचा व्यवसाय उभारण्यासोबतच इतर युवकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने किंवा ऑनलाइन सेवा केंद्राने पैशांची मागणी करणे चुकीचे आहे.
योजनांच्या नावाखाली होणारा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक किंवा दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. अशा प्रकारांचा अनुभव आल्यास लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार गजानन घुगे, मराठा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अडकिने, विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी, लाभार्थी, महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील आणि जिल्हा समन्वयक कालिदास थावरे उपस्थित होते.