Hingoli Water Conservation file photo
हिंगोली

Hingoli Water Conservation : अंजनवाडा येथील पाणी टंचाईचे संकट टळणार !

तलावात ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध, ग्रामपंचायतीच्या जनजागृतीला यश

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अंजनवाडा येथे पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तत्कालीन सरपंच किरण घोंगडे व ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब भुजबळ यांनी पाणी बचतीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे गावातील तलावात सध्या सुमारे ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

गावात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच तलावात शेतीपंप टाकून पाण्याचा उपसा करू नये, यासाठी सरपंच किरण घोंगडे व ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब भुजबळ यांनी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. या प्रयत्नांमुळे तलावातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता आगामी काळात गावात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही, असा विश्वास ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत अंजनवाडा येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत मागील काही वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा मिळत आहे. मात्र, अंजनवाडा तांडा येथे आगामी काळात तुलनेने अधिक पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तांड्यावरील नागरिकांना सार्वजनिक बोअरवेल तसेच तलावातील उपलब्ध पाणीस्रोतांचा उपयोग करून दिलासा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

गावातील पाणीपुरवठा विहिरीलगत असलेल्या तलावात सुमारे ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने सध्याच्या परिस्थितीत तलाव अधिग्रहण करण्याची आवश्यकता सध्या तरी भासणार नाही. याशिवाय गावातील सर्व नळांना तोट्या बसविण्यात आल्या असून, जलस्रोतांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. जलस्रोतांपासून ५०० मीटर परिसरातील खासगी बोअरवेल व विहिरींमधून होणारा पाणी उपसा व तलावातील विद्युत मोटारी रोखण्यासाठीही कार्यवाही करण्यात आली आहे.

  • आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ज्वारी पिकाची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनावरांसाठी चारा बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब भुजबळ, तलाठी मयुरी बंबाडे, सरपंच किरण घोंगडे, कृषी सहायक अधिकारी वैजनाथ रणेर, पोलिस पाटील विनायकराव काचगुंडे, रोजगार सेवक सटवाजी गारुळे, बंडू राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT