Parbhani Traffic Jam : रुग्‍णवाहिका २० मिनिटे कोंडीत

जाम नाका परिसरात रस्‍ता कामामुळे वाहतुकीला अडथळा
Parbhani Traffic Jam
Parbhani Traffic Jampudhari photo
Published on: 
Updated on: 

परभणी : शहरातील जाम नाका परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका शनिवारी (दि.24) सकाळी रुग्णवाहिकेला बसला. ग्रामीण भागातून रुग्णाला घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे निघालेली रुग्णवाहिका रस्त्यावरील अडथळ्यांमुळे तब्बल 20 मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून पडली. अखेर वाहतूक शाखेतील महिला पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला.

जाम नाका हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक चौक आहे. या परिसरातून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. काही दिवसांपूर्वीपर्यंत जाम नाका परिसरात बॅरिकेड्स लावले होते. त्यामुळे रुग्णवाहिकांसह अन्य वाहनांना रुग्णालयाकडे जाण्यासाठी जिंतूर रोडवरील जेल कॉर्नरमार्गे वळसा घालावा लागत होता. परिणामी, रुग्णालयात जाण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत होता.

Parbhani Traffic Jam
Nanded Soybean Crop Fire : १०० क्विंटल सोयाबीन पेटविले; सात लाखांचे नुकसान

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाम नाका परिसरातील बॅरिकेड्स हटविले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन रुग्णवाहिकांना रुग्णालयाकडे जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, रुग्णालयाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीची समस्या कायम असल्याचे शनिवारी पुन्हा दिसून आले. शनिवारी सकाळी ग्रामीण भागातून एका रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने जात होती.

जाम नाका परिसरातून पुढे जात असताना रस्त्याच्या एका बाजूला सुरू असलेले काम आणि दुसर्‍या बाजूला रस्त्यावर उभी असलेली मोठी वाहने यामुळे वाहतुकीचा मार्ग अरुंद झाला होता. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास जागा मिळत नव्हती. रुग्णवाहिकेचा सायरन वाजत असतानाही मार्ग मोकळा होत नसल्याने चालकाला वाहन थांबवावे लागले. जवळपास 20 मिनिटे रुग्णवाहिका त्याच ठिकाणी अडकून पडली.

Parbhani Traffic Jam
Jalna Crime : दहा तलाव परिसरात शासकीय पथकाला मारहाण

रुग्णवाहिका अडकल्याची बाब कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेतील महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर उभी वाहने बाजूला करण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या. तसेच वाहतूक नियंत्रित करून रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा केला. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाली. रुग्णालयाकडे जाणार्‍या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

कामाच्या ठिकाणी मोठी वाहने उभी राहणार नाहीत, तसेच रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. रुग्णाला तातडीने उपचार मिळणे आवश्यक असताना रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य वाहतूक नियमन करावे आणि रुग्णालयाकडे जाणारा मार्ग अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी नेहमीच मोकळा ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news