हिंगोली

Hingoli News: वारंगा फाटा येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे २ तोळ्याची साखळी मिळाली

अविनाश सुतार

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बालाजी पेट्रोल पंपावर पडलेली सोन्याची साखळी अज्ञाताला सापडली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या अज्ञाताचा शोध घेऊन साखळी मूळ मालकाकडे सुपूर्त करण्यात आली. पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सोन्याची साखळी मिळाल्याने येळेगाव तुकाराम येथील संजय अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीने आनंद व्यक्त केला. ही घटना आज (दि. १७) सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान घडली. Hingoli News

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी येळेगाव तुकाराम येथील संजय अग्रवाल आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून लग्नासाठी नांदेडच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी वारंगा फाटा येथील बालाजी पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. त्यांची पत्नी गाडीवरून उतरताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी खाली पडली. पेट्रोल टाकल्यानंतर ते दोघे नांदेडच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, अर्धापूर येथे थांबल्यावर त्यांना आपली साखळी गहाळ झाल्याचे लक्षात आले. Hingoli News

त्यांनी परतीचा प्रवास करत वारंगा फाटा येथील पेट्रोल पंपावर विचारपूस केली असता पंपाचे मॅनेजर व कामावर असलेले कामगार यांनी अग्रवाल यांचे म्हणणे ऐकून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये एक अज्ञात व्यक्ती मोटर सायकल उभी करून खाली पडलेली साखळी खिशात घालत असल्याचे आढळून आले. पण त्या अज्ञात व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे त्या व्यक्तीला शोधायचे कसे याविषयी चर्चा सुरू असता पेट्रोल पंपावरील कामगार शेख अजहर यांनी त्या व्यक्तीची माहिती असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने पेट्रोल भरताना पिंपळगाव येथील मंगल कार्यालयात लग्नासाठी जात असल्याचे म्हटले होते, असे शेख अजहरने सांगितले.

यानंतर शेख अजहर शेख रऊफ यांनी पिंपळगाव येथील मंगल कार्यालय गाठले. अज्ञात व्यक्तीला शोधून पडलेल्या साखळीबद्दल विचारपूस केली असता त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे साखळी सापडल्याचे सांगितले. दरम्यान, याच लग्न समारंभासाठी संजय अग्रवाल येत होते. याच ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून मिळालेली साखळी वारंगा येथील माजी सभापती आनंदराव कदम यांच्या हस्ते अग्रवाल कुटुंबांच्या स्वाधीन केली. त्यावेळी पंपावरील कामगार शेख अजहर, अनिल अर्धापुरे या दोघांच्या सतर्कतेमुळे अग्रवाल कुटुंबांना त्यांची दोन तोळ्याची साखळी मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT