हिंगोली

Maratha Reservation: लाखकरांनी अनुभवली दुसर्‍यांदा दिवाळी; मनोज जरांगेंच्या सभेसाठी ३१ क्‍विंटल पुरी-ठेचा

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात दौरा करणारे मनोज जरांगे-पाटील यांची हिंगोली येथे गुरूवारी (दि.७) विराट सभा होणार आहे. या सभेस येणार्‍या समाज बांधवांसाठी लाखकरांनी तब्बल ३१ क्‍विंटल पुरी ठेचा करण्याचा निर्णय घेत मंगळवारपासून अख्खे गाव पुरी बनविण्याच्या कामात गुंतला आहे. यासाठी गावातील अठरा पगड समाजातील समाज बांधवही मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून परिश्रम घेत असल्याने लाखकरांनी दीड महिन्यात दोनदा दिवाळी अनुभवली. Maratha Reservation

सामाजिक कामात नेहमीच पुढाकार घेणार्‍या औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील ग्रामस्थांनी मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेसाठी येणार्‍या समाज बांधवांसाठी लोक वर्गणीतून ३१ क्‍विंटल पुरी व ठेचा असे जेवण देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारपासून एक हजार पेक्षा अधिक महिला व एक हजार पेक्षा अधिक ग्रामस्थांनी पुरी लाटण्याबरोबर तळण्याचे काम हाती घेतले आहे. संपूर्ण ग्रामस्थ या कामात गुंतले आहेत. गावातील अठरा पगड समाजातील सर्वांनी लोकवर्गणी देत मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम सुरू केले आहे. Maratha Reservation

सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुरी तयार करण्याचे काम केले जात आहे. या संपूर्ण कामासाठी युवकांचाही मोठा हातभार लागत आहे. लाखमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून सर्व समाज एकत्र येऊन मराठा समाजाच्या सभेसाठी एकदिलाने काम करीत गावगाडयातील सामाजिक सलोखा कायम असल्याचे दाखवून देत आहेत. एकंदरीत लाख येथील ग्रामस्थांनी एकदिलाने निर्णय घेऊन तो तडीस नेला आहे. बुधवारी पुरी व ठेच्याची पॅकिंग करून गुरूवारी होणार्‍या सभेस्थळी त्याचे वाटप केले जाणार आहे.

अबालवृद्धांसह लहान मुलांमध्येही जरांगे- पाटील यांच्या सभेचे आकर्षण आहे. पुरी तयार करण्यासाठी लहान मुलांसह मुलीही हजर राहत आहेत. वयोवृद्ध नागरिकही मोठया उत्साहाने या सामाजिक कामात हातभार लावत असल्याने युवकांचे मनोबल उंचावले आहे. हेवेदावे बाजुला ठेवून समाजासाठी एकत्र येत गावातील एकोप्याची वीण न उसवता एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT