हिंगोली : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री उदय सामंत तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. pudhari photo
हिंगोली

Uday Samant : हिंगोलीत बाराशे कोटींची गुंतवणूक करणार

उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा, १०१ उद्योजकांसोबत गुंतवणूक करार

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी गावोगावी उद्योजक निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे. हिंगोली जिल्ह्यात १०१ उद्योजकांसोबत १ हजार २३५ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून सुमारे सात हजार ७११ स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यात १०० कोटीच्या हळदीवर प्रक्रीया करणारा उद्योग क्लस्टरच्या रुपाने उभा करण्यावर भर देण्यात येणार आहे. कळमनुरी तालुक्यातील वारंगा व कामठा येथे दोन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांना (एमआयडीसी) मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

हिंगोली येथील शांती हॉटेल, अकोला रोड येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त स्वप्नील राठोड, मैत्री मुंबईच्या नोडल अधिकारी प्रियदर्शनी सोनार, एमआयडीसीचे मुख्य अभियंता बनसोड, सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अनिल कदम, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय परभणीचे डॉ. संजय लिये यांच्यासह सुमारे ३०० उद्योजक उपस्थित होते.

राज्यात उद्योग उभारणी आणि गुंतवणूक

आकर्षित करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. दावोस येथे दरवर्षी मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करार केले जातात. त्याच धर्तीवर जिल्हास्तरावर गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या १०१ गुंतवणूक करारांतून सात हजार पेक्षा जास्त रोजगारनिर्मिती अपेक्षित असून, गाव तेथे उद्योजक तयार करण्यासाठी शासन-प्रशासन संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी जमीन, पाणी व अन्य आवश्यक संसाधनांची उपलब्धता असल्याने औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण आहे.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा आणि कामठा येथे एमआयडीसी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे. परिसरातील तीन जिल्ह्यांमधून सुमारे २५ लाख टन हळदीचे उत्पादन होत असल्याने त्यामुळे भविष्यात १०० कोटीचा हळदीवर प्रक्रीया करणारा फार मोठा उद्योग क्लस्टरच्या रुपाने उभारु शकतो, असेही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

  • जिल्ह्यात तीन एमआयडीसी असून, देशातील हळद उत्पादनात जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, एक हजार कोटी रुपयांचे उत्पादन होत आहे. जिल्ह्यात आणखी मोठे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून नवउद्योजक उभारणीवर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT