Heavy rain continues for the third day in Hingoli district
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही सोमवारी दिवसभर पाऊस सुरू होता. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आले असून इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून ६३ हजार ८६० क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीमध्ये विसर्ग केला जात आहे तर सिद्धेश्वर धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या दहा हजार लोकसंख्येच्या गावात जाण्यासाठी असलेल्या तीन पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. दरम्यान, औंढा नागनाथ शहरातील आदिनागनाथ मंदिरात पाणी शिरले असून सुमारे तीन ते चार फूट पाणी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे धरणाचे सात दरवाजे एक मीटरवरून दीड मीटर उचलण्यात आले असून सहा दरवाजे एक मीटरने उचलण्यात आले आहे.
धरणातून ६३ हजार ८६० क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे शिऊर (ता. पुसद) येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने कळमनुरी ते पुसद मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद होता. खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येलदरी धरणात पाण्याचा येवा वाढला आहे.