

Yeldari Isapur Siddheshwar dam overflow
हिंगोली: मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येलदरी, इसापूर, सिद्धेश्वर धरण भरल्याने तीनही धरणातून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांना पुराचा फटका बसला आहे. 18 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 615 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या 77.4 टक्के पाऊस झाल्याचे प्रशासनाच्या नोंदीवरून समोर आले आहे.
सोमवारी सकाळी सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडून 45 हजार 548 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला. इसापूर धरणाच्या 13 दरवाजांमधून तब्बल 63 हजार 860 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला आहे. तर येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिंतूर-सेनगाव रस्ता दिवसभर बंद होता. कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे समगा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील अनेक गावांचा हिंगोलीशी संपर्क तुटला.
कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांतील शेतांमध्ये कयाधू नदीचे पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह महसूल यंत्रणेने पूर परिस्थितीची पाहणी करून नुकसानीच्या पंचनाम्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात सरासरी 795 मि.मि. पाऊस होतो. 18 ऑगस्टपर्यंत 615 मि.मि. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या 77.4 टक्के पावसाची नोंद झाली. औंढा तालुक्यात सर्वाधिक 87.7 टक्के पाऊस झाला आहे. मागील 24 तासात हिंगोली 32.2, कळमनुरी 29.1, वसमत 14.1, औंढा नागनाथ 23.9 तर सेनगाव 35.मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.