हट्टा : गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढिगारे साचली असल्‍याचे दिसत आहे.  pudhari photo
हिंगोली

Hingoli News : हट्टा गावात स्वच्छतेची दिवाळखोरी !

घंटागाडी गायब, ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा गावात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गावात घंटागाडी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गावातील मुख्य रस्ते बाजार चौक आणि विविध भागांत कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिवाळीसारखा मोठा सण जवळ आला असतानाही गावातील स्वच्छतेकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बाजार चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचला असून, बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीमुळे निर्माण होणारा अतिरिक्त कचराही वेळेवर उचलला जात नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे.

गावातील अनेक ठिकाणी नाल्या तुडुंब भरल्या असून, भूमिगत नाल्यांच्या व्यवस्थेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ असताना स्वच्छतेचा अभाव अधिकच जाणवत आहे.

एकीकडे नागरिक दिवाळीच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे गावातील रस्त्यांवर कचरा, तुंबलेल्या नाल्या आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. गावातील अनेक ठिकाणी पोलवरील पथदिवे बसविणे किंवा बंद दिवे सुरू करणे आवश्यक असल्याची मागणीही होत आहे.

ग्रामपंचायतीने तातडीने घंटागाडी नियमित सुरू करावी, गावातील सर्व भागांतील कचरा उचलावा, मुख्य रस्ते व बाजारपेठेची स्वच्छता करावी, तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करावी तसेच आवश्यक ठिकाणी पथदिवे बसवून प्रकाशव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • दिवाळीच्या सणात तरी हट्टा गाव स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशमय दिसणार का? की नागरिकांना अस्वच्छतेतच सण साजरा करावा लागणार? असा सवाल उपस्थित होत असून, ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT