Hingoli Farmers Water Crisis pudhari photo
हिंगोली

Hingoli Farmers Water Crisis : पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

टँकरचा घेतला आधार, शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

पुढारी वृत्तसेवा

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरात यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातच आता रब्बी पिके वाचविण्यासाठी शेतकरी जीवाची धडपड करत आहेत. विहिरी, बोरवेल कोरड्या पडल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासारखी खरीप पिके हातची गेली. हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी आधीच कर्जात बुडाला आहे. आता रब्बी हंगामावरच शेतकऱ्याची सगळी भिस्त आहे. रब्बी वाचले तरच घर चालेल, अशी अवस्था झाली आहे.

परिसरात सध्या हळद, हरभरा आणि गहू ही मुख्य रब्बी पिके आहेत. पाण्याअभावी ही पिके माना टाकू लागली आहेत. पिके वाळून जाऊ नयेत म्हणून शेतकरी 2 हजार ते 3 हजार रुपये मोजून पाण्याचे टँकर मागवत आहेत. टँकरचे पाणी शेतात सोडून पिकांना जीवदान दिले जात आहे. टँकरने पाणी देणे म्हणजे शेतकऱ्याला दर वेळी हजारो रुपयांचा भुर्दंड आहे. तरीही पीक वाचावे म्हणून शेतकरी कर्ज काढून, उधार घेऊन टँकर मागवत आहे.

टँकरचे पाणीही पुरत नसल्याने शेतकरी रात्रंदिवस शेतातच ठाण मांडून आहे. खरीप गेला, आता रब्बी गेला तर जगायचे कसे? म्हणून टँकरने का होईना पीक वाचवतोय. पण टँकर किती दिवस परवडणार?“ अशी व्यथा गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT