गौळ बाजार येथे जलजीवन कामात मोठा घोटाळा !  pudhari photo
हिंगोली

Jal Jeevan Mission scam : गौळ बाजार येथे जलजीवन कामात मोठा घोटाळा !

विहीर-टाकी न करताच 57 लाख रुपयांची उचल

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी : जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील गौळ बाजार येथे 1 कोटी 7 लाख रूपयांच्या निधी अंतर्गत कामात गुत्तेदाराकडून थातूर-मातुर व अर्धवट काम करीत कागदोपत्री व एम बी दाखवत 57 लाखांचे बिल ही उचल करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून गुत्तेदाराच्या प्रतापाने मात्र गाव अद्यापही तहानलेलेच आहे.

गौळ बाजार येथे 2022-23 मध्ये गावाचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत गावाची तहान भागवण्यासाठी विहीर, टाकी व पाईपलाईनच्या कामासाठी 1 कोटी 7 लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. पण निधी अभावी हे काम काल मर्यादेत होऊ शकले नाही. शासनाने पाणी प्रश्न निवारणासाठी निधी उपलब्ध करून देत तांत्रिक अडचण दूर केली. पण संबंधित गुत्तेदाराने कामात उदासिनता दाखवत काम रेंगाळत ठेवले. पण कागदोपत्री काम दाखवत बिल उचलण्यात तत्परता दाखवली.

गावात पाईपलाईन थातूर-मातुर पद्धतीने टाकली. पण अद्यापही विहीर व टाकीच्या कामाचा श्री गणेशाही केला नाही. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मात्र खोटे एम बी दाखवत व कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवत गुत्तेदाराने तब्बल 57 लाख रुपयांची उचल केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष पाहणीमध्ये गावात ना विहीर उभारण्यात आली, ना पाण्याची टाकी बांधण्यात आली. फक्त काही ठिकाणी अर्धवट पाईपलाईन टाकून काम झाल्याचे दाखवण्यात आले. निकृष्ट आणि अपूर्ण काम करून परस्पर बिल उचलल्याने संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • या प्रकारामुळे गावकऱ्यांना अद्यापही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून गुत्तेदाराच्या भ्रष्टाचारामुळे हर घर जलचा दावा फोल ठरत आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व गुत्तेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशीही मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT