हिंगोली ः सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील मागील पाच वर्षांत झालेल्या विहिरींच्या कामाची स्थळ पाहणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन विहिरींच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील रामचंद्र खडसे यांनी विहीर चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत जागेवर विहीरीच नसल्याचे स्पष्ट झाले. या शिवाय आणखी सात विहिरींपैकी चार विहीरी गायब असल्याचेही आढळून आले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तातडीने गावात भेट देऊन अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, हमी योजनेचे गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, उदय उपवर यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच धनगरवाडी येथे भेट देऊन पाहणी केली.
या पाहणीच्या वेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर आता धनगरवाडी गावात मागील पाच वर्षात देण्यात आलेल्या विहिरींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार उपमुख्यकार्यकारी अधिकारी गड्डापोड, गटविकास अधिकारी बोंढारे यांनी तातडीने पालक तांत्रिक अधिकारी, संगणक ऑपरेटर व ग्रामरोजगार सेवक यांची पाच पथके स्थापन केली आहेत. या पथकांना धनगरवाडीत मागील पाच वर्षांत झालेल्या सर्व विहीरींच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी त्या ठिकाणी विहिरी आहेत काय तसेच कामे झालेली आहेत काय त्याचे मूल्यांकन झाले आहे काय याची सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुढील आठ दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
धनगरवाडी येथील विहिरीच्या अनुदान अपहार प्रकरणात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी काढले आहेत. त्यानुसार आता गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक दिलीप मोरे यांचे पथक या प्रकरणाचा तपास करणार असून यातून अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.