Hingoli News : शासकीय रिक्त पदे तातडीने भरा, आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा  File Photo
हिंगोली

Hingoli News : शासकीय रिक्त पदे तातडीने भरा, आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा

मागील २५ दिवसांपासून युवक कल्याण संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु

पुढारी वृत्तसेवा

Fill government vacancies immediately, tribal community marches in front of the District Collector's Office

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: राज्यात शासकिय कार्यालयांमधून अनुसूचित जमातीच्या ८५ हजार रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी मागील २५ दिवसांपासून युवक कल्याण संघाचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु असून या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

या उपोषणाला राजकिय पक्षांच्या पदाधिकार्यांनी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंगोली दौर्यात त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन भाषणातून दिले होते.

मात्र त्यानंतरही कुठल्याही प्रकाराची कार्यवाही झाली नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधनासाठी आदिवासी बांधवांनी मोर्चाचे आयोजन केले होते. शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

यामध्ये महिला मंडळाची संख्याही लक्षणीय होती. आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांचे फलक हाती घेण्यात आले होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, संजय भुरके, आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना टारफे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगोली शहरातील प्रमुखमार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.

राज्यात अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित विभागाने कालबध्द कार्यक्रम राबवून विशेष पदभरती मोहिम घ्यावी, राज्यातील विविध शासकिय कार्यालयात रिक्त असलेल्या अनुसूचित जमाती संवर्गातील ८५ हजार पदे तातडीने भरावीत, शासकीय व निमशासकिय पदभरतीमध्ये अनुसुचीत जमातीसाठी जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे, जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैधता प्रकरणांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने १६ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT