

औंढा नागनाथ: कामाच्या शोधात पुण्यातील चाकण येथे गेलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून चाकण येथील श्याम राठोड नावाच्या तरुणावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्याकडे रवाना झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक कुटुंब काही काळापूर्वी रोजगारासाठी चाकण येथे गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची अल्पवयीन मुलगीही होती. तिथे आरोपी श्याम राठोड हा त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांशी ओळख वाढवली आणि मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. याच काळात त्याने तिच्यावर अत्याचार केला.
काही दिवसांनी हे कुटुंब आपल्या मूळ गावी परतल्यानंतर आरोपी श्याम हा देखील त्यांच्या मागावर औंढा येथे पोहोचला. त्याने पीडित मुलीला शहरातील एका उद्यानात बोलावून जवळच्याच माळरानावर नेत तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
यानंतर कुटुंबीयांनी तातडीने औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी श्याम राठोड विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे आणि उपनिरीक्षक शेख खुदुस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.