पॅकबंद भगरीचीच विक्री करण्याचे आदेश pudhari photo
हिंगोली

Hingoli food safety : पॅकबंद भगरीचीच विक्री करण्याचे आदेश

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली :बाजारपेठेतून उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर भगर खरेदी विक्री होत असून व्यापाऱ्यांनी निकृष्ट दर्जाची भगर किंवा इतर अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्यास कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. विक्रेत्यांनीही पॅकबंद भगरीची विक्री करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर भगरीचा वापर केला जातो. भगर खरेदी करताना आवश्यक काळजी न घेतल्याने आरोग्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली व परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पवन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, राजश्री सावंत यांच्या पथकाकडून दुकानांमधील भगरीची तपासणी केली जात आहे.

या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले की, भगर तयार करताना प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचे वापर करतात. भगर तयार करण्यासाठी वापरात येणारे धान्यांवरून भगरचे प्रकार पडतात. भगरीमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन असतात तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियम या सारखी खनीजे असतात. मधुमेही रुग्णांसाठी पण भगर हा उत्तम आहार आहे. अशी सत्वगुणी भगर आरोग्याला अपायकारक का ठरते आहे.

या प्रकरणांचा अन्न व औषध प्रशासनाने अभ्यास केला असता भगरीवर मोठया प्रमाणात बुरशीचे प्रादुर्भाव होते. ज्यामुळे त्याच्यावर विषद्रव्ये तयार होतात. २५ ते ३१ सेल्सियस तापमान व आर्द्रता हे बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. पाकीटबंद भगरचे लेबल तपासावे. लेबलवर पॅकिंग दिनांक व बेस्ट बिफोर तपासूनच वापर करा. भगर साठवतांना ती स्वच्छ कोरड्या डब्यात ठेवा. जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. शक्यतो भगरीचे पीठ आणू नका, भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्यावे. जास्त दिवस पीठ साठवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

  • भगर विक्रेत्यांनी शक्यतो पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर विक्री करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी. भगरीच्या पॅकेटवर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक, बेस्ट बिफोर तारीख असल्याची खात्री करावी. मुदत बाह्य भगर किंवा भगर पीठाची विक्री करून नये. कमी दर्जाची भगर किंवा इतर अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT