

वसमत : येथील बँक कॉलनी भागात अवघ्या दीड तासात शिक्षिकेचे घर फोडून चोरट्यांनी ३.५० लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके स्थापन केली आहेत.
वसमत येथील बँक कॉलनी भागातील शिक्षिका गोदावरी भवानगर या गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बँकेत गेल्या होत्या. यावेळी घरी कोणीही नसल्याने त्यांनी घराला कुलुप लावले होते. मात्र घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर घरातील लाकडी कपाट तोडून त्यातील सुमारे ३.५० लाख रुपये किमतीचे दागिने पळविले.
यामध्ये दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, दीड तोळे वजनाची सोन्याचे कानातले, एक तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आदी मुद्देमालाचा समावेश आहे. दरम्यान, त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्यानंतर गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना माहिती दिली. त्यामुळे त्या सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांनी कपाटात पाहणी केली असता त्यातील दागिने पळविल्याचे दिसून आले.
त्यांनी तातडीने वसमत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, उपाधिक्षक मयूर रसाळ, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गोदावरी भवानकर यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डेडवाल पुढील करीत आहेत.
भर दिवसा झालेल्या या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.