हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या आवाहनानुसार जिल्हाभरात मागील चार दिवसांपासून आंदोलने केली जात आहेत. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावागावात बंदी घातली जात आहे. आधी आरक्षण द्या, तरच गावात या, अन्यथा माघारी फिरा, अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने राजकीय नेत्यांची कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. (Hingoli Maratha Andolan)
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद सर्कलनिहाय साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे साखळी उपोषणात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. गावोगावी केवळ एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. रात्रीच्या वेळेस कॅन्डल मार्च काढून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. (Hingoli Maratha Andolan)
परिवहन महामंडळाच्या बसेसवर असलेल्या शासनाच्या जाहीरातीला काळे फासण्याचा एककलमी कार्यक्रम मराठा युवकांनी हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच महामंडळाची बस रस्त्यावर धावणार नसल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत जिल्हाभरात आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाचे लोण संपूर्ण जिल्हाभरात पसरले आहे. तसेच आंदोलन आता व्यापक स्वरूपात केले जात असल्याने प्रशासनाची दमछाक होते आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 150 पेक्षा अधिक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षाच्या चिन्हांसह पक्षाची शाखा असलेले फलक काढले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले कमळ अनेक गावातून हद्दपार करण्यात आले आहे. गावोगावी भिंतीवर रेखाटण्यात आलेले कमळ चिन्ह मिटविले जात आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून त्याचा फटका सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना बसत असला तरी भाजपतील काही इच्छुकांनी गावोगावी कमळ चिन्ह रेखाटले होते. ते चिन्ह गावातूनच हद्दपार केले जात आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे सुरु असलेल्या सकल मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे, यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सरकारने सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात दिरंगाई धोरण अवलंबले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आज (दि. २९) सकाळी हिंगोली आगाराच्या एसटी बसवर असलेल्या सरकारच्या जाहिरातील फोटोला काळे फासून घोषणा देत निषेध नोंदवला.
आडगाव येथे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हट्टा येथे सर्कलनिहाय साखळी उपोषण सुरू झाले आहे. आडगाव ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले. दरम्यान गावातील दोन ग्रामपंचायत सदस्य, दोन सोसायटी सदस्य यांच्यासह राष्ट्रवादी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली राजीनामे दिले आहेत.
हेही वाचा