हिंगोली ः येथील एका पंपावर डिझेल नेण्यासाठी कॅना घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची रांग. pudhari photo
हिंगोली

Hingoli Diesel Shortage : कुणी डिझेल देता का डिझेल!

मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश पंपांवर डिझेलसाठी ट्रॅक्टर चालकांची प्रचंड गर्दी

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ः मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश पंपांवर डिझेलसाठी ट्रॅक्टर चालकांची प्रचंड गर्दी होत आहे. डिझेलसाठी प्लास्टिकच्या कॅन घेऊन आलेल्या ट्रॅक्टर मालकांना तासन्‌‍तास रांगेत उभे राहून डिझेल मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे शेतीच्या मशागतीची कामे सुरू असताना डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तर दुसरीकडे पंप चालकही वाढत्या गर्दीने हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

पेरणी तोंडावर आल्याने शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांकडून हळद लागवडीची तयारी सुरू करण्यात आली आहे. हळदीसाठी शेत तयार केले जात आहे. त्यासाठी डिझेल आवश्यक असल्याने अचानकपणे डिझेलची मागणी वाढली आहे.

काही दिवसांपुर्वी पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल व डिझेल कमी वापरण्याचे आवाहन केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परिणामी, डिझेल टंचाईच्या भितीपोटी ट्रॅक्टर चालकांकडून डिझेलचा साठा करण्यावर भर दिला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पंपांवर गर्दी दिसून येत आहे. पंपावर दररोजच्या वाहनांची गर्दी तर कायम असून ग्रामीण भागातून शेतीच्या मशागतीसाठी डिझेल खरेदीसाठी शेतकरी प्लास्टीकच्या कॅन घेऊन येत आहेत. बहुतांश पेट्रोल पंपांवर एक वाहनांची तर दुसरी कॅन धारक शेतकऱ्यांची रांग लागल्याचे दिसून येत आहे

तळपत्या उन्हात डिझेल नेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढत्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वादाच्या घटना देखील घडत आहेत. पंपांवर हमरा-तुमरी होत असली तरी या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतो आहे. पुढील काळात परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करून पोलीस बंदोबस्तात डिझेल व पेट्रोलचे वाटप करण्याची वेळ येणार आहे.

प्रशासनाने या बाबीची वेळीच गंभीर दखल घेणे गरजेचे बनले आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून मुबलक प्रमाणात डिझेल व पेट्रोलचा साठा असल्याचा दावा केला जात आहे. परंतू, बहुतांश पेट्रोल पंपांवर दुपारनंतर डिझेल संपल्याचे सांगितले जात आहे. यावरही प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे असून यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

वसमतमध्ये डिझेलच्या मापात पाप?

वसमत : शहरात काही पेट्रोल पंपांवर ग्राहकांना कमी पेट्रोल टाकून फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही कर्मचाऱ्यांकडून पेट्रोलमध्ये दांडी मारली जात असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल भरण्याच्या मशीनमध्ये रक्कम किंवा लिटर सेट करून इंधन देण्याची सुविधा उपलब्ध असतानाही काही ठिकाणी थेट मशीन सुरू करून पेट्रोल टाकले जात आहे.

यामुळे ग्राहकांचे लक्ष विचलित होत असून कमी पेट्रोल मिळण्याची शक्यता वाढत असल्याची चर्चा आहे. अनेक वाहनधारकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक आधीच आर्थिक ताण सहन करत आहेत. त्यातच काही पेट्रोल पंपांवर कमी इंधन दिले जात असल्याचा प्रकार घडत असेल तर सामान्यांच्या खिशाला दुहेरी झळ बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेषतः गर्दीच्या वेळेत ग्राहकांना घाईत ठेवून किंवा संभ्रम निर्माण करून पेट्रोल भरण्याचे प्रकार होत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल भरताना मीटर शून्यावर आहे का, रक्कम योग्य सेट केली आहे का याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही जाणकारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुरवठा विभाग व वजनमाप विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील संबंधित पेट्रोल पंपांची तात्काळ तपासणी करावी, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करावा

जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असताना या संपूर्ण प्रकाराकडे लोकप्रतिनिधी मात्र लक्ष देत नाहीत असा आरोप शेतकऱ्यांमधून होऊ लागला आहे. डिझेलची टंचाई दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT