Ratnagiri News : दापोली तालुक्यावर मोठे इंधन संकट

सीएनजी, पेट्रोलबरोबर घरगुती गॅसही मिळेना; नागरिकांत संताप
Ratnagiri News
दापोली : तालुक्यात इंधन टंचाईमुळे नागरिकांनी घरगुती गॅस सिलिंडर एजन्सीसमोर केलेली गर्दी.
Published on
Updated on

दापोली : तालुक्यात सध्या पेट्रोल, सीएनजी तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. वाहन चालकांना सीएनजीसाठी रात्रभर रांगेत जागून काढावी लागत आहे. पेट्रोलचाही तुटवडा गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असून तासनतास वाहन चालक रांगेत उभे राहात आहेत. एलपीजी घरगुती गॅसचा तुटवडा अनेक दिवसांपासून कायम असून नागरिकांना सिलिंडरसाठी रोज गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे दापोली तालुक्यावर इंधन संकट ओढवल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात नागरिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत असले तरी होईल, पाहतो अशा उत्तरांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सीएनजी पंप चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. वाहन चालक तसेच पत्रकारांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप होत आहे. एकीकडे पेट्रोल तुटवडा असताना पंप चालक खुशाल बाटल्या, कॅनमध्ये पेट्रोल देत असल्याचे चित्र आहे.

पेट्रोल व सीएनजी व्यावसायिकांच्या मनमानीबाबत पत्रकारांनी दापोली तहसीलदार अर्चना बोंबे आणि पुरवठा निरीक्षक ओंकार राणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र तरीही संबंधित व्यावसायिकांची मुजोरी थांबत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारामुळे संतप्त वाहन चालकांनी संबंधितांना जाब विचारल्याची चर्चा तालुक्यात होती. दुसरीकडे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल, खानावळी तसेच छोट्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहक गर्दी करत आहेत. मात्र, तरीही अनेकांना सिलिंडर न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

काही पेट्रोल पंप चालकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत. प्रशासन आणि पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याने दापोलीला वाली कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पर्यटन हंगामातच निर्माण झालेल्या या संकटामुळे अनेक पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून इंधन आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news