Crime News pudhari photo
हिंगोली

Hingoli Crime : जयनगर येथे भरदिवसा घरफोडी

चाेऱ्यांचे प्रमाण वाढले, पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

वसमत: शहरातील परभणी रोडलगत असलेल्या जयनगर परिसरात शुक्रवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक उल्हास शंकरराव राठोड यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले असुन, घरातील दोन लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन ऐवज लंपास केल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हास राठोड हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेवुन घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तीन संशयित युवक बिना नंबरप्लेट असलेल्या युनिकॉर्न मोटार सायकलवरून परिसरात आले होते. तिघांनीही तोंडाला मास्क लावले होते.

परिसरातील काही महिलांकडे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध नसलेल्या व्यक्तींचे पत्ते विचारले. त्यानंतर संशयितांनी परिसरात काही वेळ राउंड मारून घरांची पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. राठोड यांच्या घराला कुलूप असल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन त्यातील ऐवज लंपास करून चोरटे पसार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तसेच पोलिस अधिक्षक कार्यालयातुन फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळी ठसे घेण्यात आले.

दरम्यान, पोलिसांकडुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असुन, संशयित चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT