Cyber Crime Pudhari
हिंगोली

Cyber Fraudsters Steal ₹2.75 Lakh |सेवकाच्या खात्यातून पावणे तीन लाख वळविले

सायबर भामट्यांचा प्रताप, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ : तालुक्यातील लाख येथे एका सेवकाच्या मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड होताच अवघ्या दोन तासांतच सुमारे पावणे तीन लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन वळविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सायबर भामट्या विरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील माधव केंद्रे हे कंजारा येथील एका खासगी संस्थेवर सेवक म्हणून काम करतात. शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एक एपीके फाईल डाऊनलोड झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच सुमारे १०० ते २०० मेसेज आले. मात्र मेसेजची भाषा त्यांना समजली नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, रात्री पावणे आठ ते साडेनऊ या कालावाधीत त्यांच्या बँक खात्यातून चार वेळा रक्कम ऑलाईन काढण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. पहिल्या वेळी २५ हजार, दुसऱ्यावेळी १ लाख, तिसऱ्या वेळी १ लाख तर चौथ्यावेळी ५० हजार रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. मात्र आपण रक्कम काढलीच नसल्याने हा मेसेज कसा आला याची शाहनिशा करण्यासाठी त्यांनी सोमवारी त्यांचे बँक खाते असलेल्या इंडियन ओव्हरसिस बँकेत धाव घेतली.

यावेळी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकार सांगितला. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याचा उतारा तपासला असता सदर रक्कम ऑनलाईन काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेकडे तक्रार दिली. त्यानंतर बुधवारी रात्री औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सायबर भामट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार रवीकांत हरकाळ, संदीप चंद्रशेखर पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT